न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २९ जुलै २०२५) :- नारळ विक्री व ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला गोडावूनच्या ठिकाणी येऊन मारहाण, खंडणीची मागणी व जिवे मारण्याच्या धमक्यांची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी काळेवाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बसवराज घोडके (वय ४३, रा. ज्योतिबा नगर) यांनी तक्रार दिली असून, आरोपी वैभव नांजरकर व त्याच्या अन्य ८ साथीदारांनी फिर्यादीकडे खंडणीची मागणी केली.
आरोपी वैभव याने फोनवरून फिर्यादीकडे ₹३,५०,००० खंडणी मागितली. त्यानंतर प्रत्यक्ष गोडावूनवर येऊन ₹९०,००० रुपये घेतले आणि गोडावूनच्या गेटवर दगडफेक व अॅरो अॅक्वा प्लांटचे नुकसान केले.
तसेच, आरोपी क्र. २ ने लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला. दि. २७ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजता, आरोपी क्र. ३ व त्याचे अन्य सहा-सात मित्र लाल रंगाच्या स्वीफ्ट कार व मोटारसायकलवर येऊन गोडावूनमध्ये घुसले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत पुन्हा पैसे मागितले. पैशांची मागणी न पुर्ण केल्यास “खल्लास करून टाकू” अशी उघड धमकी दिली. एका इसमाने तर बिअरची बाटली उगारून जीवे मारण्याची धमकी दिली.
सध्या सर्व आरोपी पसार असून, कोणालाही अटक झालेली नाही. पुढील तपास पोउपनि सुर्यवंशी करीत आहेत.












