न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या ७७ सुरक्षा रक्षकांच्या सेवेत पुढील दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) यांच्यामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या या रक्षकांचा करार १५ जुलै २०२५ रोजी संपत आहे, त्यामुळे नव्याने करारनामा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, त्याला महापालिका आयुक्तांनी मंगळवारी (दि. २९) रोजी सभेत मंजुरी दिली.
सुरक्षा विभागाने नमूद केल्यानुसार, महापालिकेतील रखवालदार पदे रिक्त असल्याने सुरक्षा व्यवस्थेत तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मेस्कोमार्फत कार्यरत असलेले रक्षक कायम ठेवणे अत्यावश्यक ठरते. कामगार कल्याण विभागाने निर्धारित केलेल्या किमान वेतन व महागाई भत्त्यांनुसार, प्रति रक्षक रु. ३३,६३३/- इतका मासिक खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे ७७ रक्षकांवर दरमहा अंदाजे रु. २५.८९ लाख तर दोन वर्षांचा एकूण खर्च सुमारे रु. ६.२१ कोटी इतका होणार आहे.
सदर नियुक्ती शासन निर्णयानुसार मेस्कोमार्फत थेट करण्यात येते, त्यामुळे निविदा प्रक्रियेची आवश्यकता भासत नाही. यासंदर्भात नवीन करारनामा करून खर्चास मान्यता मिळविण्याचा प्रस्ताव आयुक्त तथा प्रशासकांकडे सादर करण्यात आला होता. मेस्कोमार्फत नियुक्त रक्षकांना रक्षा मंत्रालयाच्या डायरेक्टर जनरल रिसेटलमेंट विभागाने ठरवलेले वेतन दर लागू असून, त्यात दर सहा महिन्यांनी कामगार विभागाच्या सूचनेनुसार VDA (Variable Dearness Allowance) बदल केला जातो.
या प्रस्तावास मान्यता मिळाल्याने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दिनांक १६ जुलै २०२५ पासून १५ जुलै २०२७ पर्यंत मेस्कोचे सुरक्षा रक्षक कार्यरत राहणार आहेत. या निर्णयामुळे रुग्णालयांतील सुरक्षेविषयक कामकाज सुरळीत सुरू राहण्यास हातभार लागणार आहे.












