- नव्या रुग्णालयासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ह. क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मौजे सांगवी येथील आरक्षण क्र. ३४१ याठिकाणी सांगवी हॉस्पिटलसाठी जुनी इमारत पाडून आधुनिक, नवी इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिकेने ४० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रक वर्ष २०२४-२५ मध्ये घेतली असून, कामासाठी वास्तुविशारदांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी ई-कोटेशन प्रणालीद्वारे निविदा मागवण्यात आल्या होत्या. एकूण तीन वास्तुविशारद कंपन्यांनी निविदा सादर केल्या असून, त्यापैकी M/s Neogen Consultants, Pune यांनी सर्वात कमी म्हणजेच एकूण १.९५% दराने (निविदा पूर्व ०.४२% व निविदा पश्चात १.५३%) आपली सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. उर्वरित प्रतिस्पर्धींनी १.९९% दर सादर केला होता. त्यामुळे, सर्वात लघुत्तम दर सादर करणाऱ्या Neogen Consultants यांची वास्तुविशारद म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार संबंधित कंपनीसोबत अटी व शर्तींसह करार करण्यात येणार असून, सर्व कामे मनपा दरसूचीप्रमाणे करण्यात येतील. सद्यस्थितीत महापालिकेत प्रशासक कार्यरत असल्याने, हा प्रस्ताव स्थायी समितीच्या प्राप्त अधिकारांतर्गत प्रशासकांच्या अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. या नवीन इमारतीच्या माध्यमातून सांगवी परिसरातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.












