- व्याज सोडून केवळ मुळ रक्कम वसूल करण्याचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत रावेत येथे उभारण्यात येणाऱ्या ९३४ गाळ्यांच्या निवासी प्रकल्पास न्यायालयीन स्थगितीमुळे विलंब झाला होता. सदर प्रकल्प उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात झालेल्या खटल्यांनंतर मार्गमुक्त झाला असला तरी मुदत संपल्यामुळे तो आता रद्द करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठेकेदाराकडून केवळ दिलेल्या ऍडव्हान्सची मूळ रक्कम वसूल करून व्याज माफ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
या प्रकल्पासाठी मे. मनाज इन्फ्राकन्स्ट्रक्शन लि. या ठेकेदारास रु. ४.४१ कोटींचे बांधकाम साहित्य व यंत्रसामग्रीचा आगाऊ भरणा करण्यात आला होता. न्यायालयीन स्थगिती आणि बांधकाम नियमावलीत झालेल्या बदलांमुळे हे काम पुढे जाऊ शकत नसल्याने अखेर महापालिकेने PMAY 2.0 मध्ये नव्याने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, ठेकेदाराने या ऍडव्हान्सवरील रु. १.८३ कोटींच्या व्याजाची माफीकरीता मागणी केली होती.
महापालिकेने स्थापन केलेल्या वाद निवारण समिती (Dispute Redressal Committee) बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. समितीने प्रकल्प मनपाच्याच निर्णयाने रद्द झाल्यामुळे व ठेकेदाराने बांधकाम साहित्य वापरले असल्याचे लक्षात घेता, फक्त मूळ ऍडव्हान्स रक्कम वसूल करावी आणि व्याजाची आकारणी करू नये, असा निर्णय दिला.
या निर्णयास मान्यता मिळावी यासाठी महापालिका प्रशासकांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सध्या स्थायी समिती अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्तांनी याला मंजुरी दिली आहे. यामुळे ठेकेदाराची व्याज आकारणी टळणार आहे.












