न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. ३० जुलै २०२५) :- व्हॉट्सअॅपवरील बनावट गुंतवणूक योजनांच्या जाळ्यात अडकवून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची तब्बल ₹४६.६० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अन्या स्मिथ, विविध व्हॉट्सअॅप नंबर धारक व लिंकधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आप्पासाहेब कोष्टी (वय ५४, रा. जुनी सांगवी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत त्यांना “D558-VIP BofA Securities India Ltd.” व “B209 BlackRock Road to Wealth” या व्हॉट्सअॅप गुंतवणूक ग्रुप्समध्ये सहभागी करून घेतले. ग्रुप अॅडमिन्सनी “Edge” व “BR MCN” नावाची अॅप्स डाऊनलोड करण्यास सांगितले आणि अधिक परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणुकीस प्रवृत्त केले.
या आमिषाला बळी पडून फिर्यादीने ३१.८० लाख व १७.८० लाख रुपये अशा एकूण ४६.६० लाख रुपयांची गुंतवणूक केली. परंतु नंतर कोणताही परतावा मिळाला नाही. आरोपींनी त्यांचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भा.न्या.सं. कलम व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोनि (गुन्हे) नांदेकर तपास करीत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.












