- विविध संघटनांची ₹२५ ते ₹३६ प्रति किमी दराची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३० जुलै २०२५) :- ओला-उबरसारख्या मोबाईल ॲप-आधारित कॅब सेवा कंपन्यांच्या दर निश्चितीसंदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अलीकडेच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध टॅक्सी आणि कॅब संघटनांच्या प्रतिनिधींनी हॅचबॅकसाठी ₹२५, सेडानसाठी ₹३० आणि एसयूव्ही (SUV) साठी ₹३६ प्रति किलोमीटर दर तात्काळ लागू करण्याची एकमुखी मागणी केली.
बैठकीस पुणे आरटीओ अधिकारी अर्चना गायकवाड, पिंपरी-चिंचवड आरटीओ अधिकारी संदेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे, मासाहेब कॅब संघटनेच्या अध्यक्षा वर्षा शिंदे, मनसे वाहतूक विभागाचे रुपेश कदम, महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष बिरुदेव पालवे, सारथी वाहतूक संघटनेचे सल्लागार अजय मुंडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते.
दर फक्त ₹८-₹९; चालकांचे आर्थिक शोषण – डॉ. बाबा कांबळे…
डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले की, “पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे १.३० लाख कॅब मालक व २ लाखांहून अधिक चालक कार्यरत आहेत. मात्र, ओला-उबरसारख्या कंपन्यांकडून सध्या फक्त ₹८ ते ₹९ प्रति किलोमीटर दर दिला जात आहे, जो पूर्णपणे अन्यायकारक आहे. यामुळे चालकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होत आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “दर निश्चित न झाल्यामुळे आरटीओ व सरकार कोणतीही ठोस कारवाई करत नाही. त्यामुळे दर निश्चितीसाठी ही बैठक घेण्यात आली.”
मागणी शास्त्रीय सूत्रावर आधारित…
डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले की, मागणी केलेले दर हे महागाई निर्देशांक, वाहन झीज, कर्जाचे हप्ते, टायर, विमा, पासिंग खर्च आणि कुटुंबाच्या शैक्षणिक गरजा या घटकांवर आधारित आहेत. याआधी पाटणकर, हकीम आणि खटवा समित्यांमार्फत याच प्रकारची सूत्रे स्वीकारली गेली होती.
“विनंती नव्हे, आदेश हवेत” – वर्षा शिंदे…
मासाहेब कॅब संघटनेच्या अध्यक्षा वर्षा शिंदे म्हणाल्या की, “आमच्या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ओला-उबरला ₹२५ प्रति किमी दरावरील पत्र दिले होते, पण त्यात कायदेशीर बंधन नव्हते. त्यामुळे कंपन्यांनी ते उडवून लावले. आता आरटीओमार्फत कायदेशीर दर निश्चित झाले पाहिजेत.”
“आता प्रतीक्षा नाही; निर्णय हवा” – बिरुदेव पालवे…
महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष बिरुदेव पालवे म्हणाले की, “चर्चा खूप झाली, आता कारवाई हवी. कालमर्यादा न ठेवता तात्काळ निर्णय घ्यावा.”
“न्याय नाही तर आंदोलन” – संघटनांचा इशारा…
सर्व संघटनांनी सरकारला इशारा दिला की, जर लवकरच कायदेशीर दर निश्चित झाले नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू.
थोडक्यात मागण्या…
* हॅचबॅक: ₹२५/km
* सेडान: ₹३०/km
* SUV: ₹३६/km
* कायदेशीर आदेश स्वरूपात दर लागू करावेत..
* महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये दर निश्चितीसाठी तत्काळ बैठक आयोजित कराव्यात..

















