- १६ गावठी पिस्तुले आणि ४२ जिवंत काडतुसे जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एक मोठी कारवाई करत अवैधरित्या शस्त्र विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ देशी बनावटीची पिस्तुले व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत, आयुक्तालय क्षेत्रातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांच्याकडून अवैध शस्त्र वापराच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.
पथकातील सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस अंमलदार गणेश सावंत, विनोद वीर, सुमित देवकर, हर्षद कदम हे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना सुरज राजू गिराम उर्फ डोंगरे (वय २०, रा. मेदनकरवाडी, चाकण) हा मोशी प्राधिकरण येथील आर.टी.ओ. रोडवर गावठी पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
सदर माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत पथकाने सुरज गिराम यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून १,०२,००० रुपयांची अंदाजे किंमत असलेली २ देशी बनावटीची पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ४४०/२०२५ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरफ्तार आरोपीवर यापूर्वीही चाकण पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगण्याचा गुन्हा नोंद आहे. पथकाने २०२५ या वर्षात आतापर्यंत केलेल्या सात महिन्यांतील कारवाईत एकूण १६ गावठी पिस्तुले आणि ४२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईसाठी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पांडुरंग देवकाते, तसेच अंमलदार गणेश सावंत, हर्षद कदम, सुमित देवकर, विनोद वीर, प्रविण कांबळे, गणेश हिंगे, सोमनाथ मोरे यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे.












