न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाच्या बंगल्यावर दरोडा टाकणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली असून, एकूण ६.१५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी निगडीतील एका बंगल्यावर पाच अनोळखी इसमांनी ज्येष्ठ नागरिकाचे हातपाय बांधून, तोंडाला टेप लावून घरातील दागिने व वस्तू चोरून दरोडा टाकला होता. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गु.रजि. क्र. २९६/२०२५ अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने तपास सुरू केला. २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास व माहितीच्या आधारे मुख्य आरोपी सुरेश लादुराम ढाका (रा. जालोर, राजस्थान) यास जयपूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, मोबाईल, वॉकीटॉकी, दागिने व ओळखीची कागदपत्रे जप्त करण्यात आली.
तपासाच्या पुढील टप्प्यात दुसरा आरोपी महिपाल रामलाल बिष्णोई (रा. जौधपूर, राजस्थान) यास तळेगाव येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, घड्याळ, बनावट नंबर प्लेट आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या आरोपींवर यापूर्वीही राजस्थान व गुजरात राज्यात खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी यांसारखे २१ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील एक महिला आरोपीसह आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
या यशस्वी कामगिरीसाठी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने संयुक्त कारवाई केली. तपासाचे पुढील काम मालमत्ता गुन्हे विरोधी पथक करीत आहे.












