- वाहतूक कोंडी कशी टाळणार; शहर मनसेकडून इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 01 ऑगस्ट 2025) :- निगडी प्राधिकरण परिसरात सध्या महापालिकेच्या वतीने “हरित सेतू” या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्राधिकरणातील एकूण ३३ लहान-मोठ्या व अंतर्गत रस्त्यांवर काम सुरू असून, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर प्राधिकरण परिसरातील नागरिकांची बैठक झाली असून, नागरिकांच्या तक्रारी व सूचना लक्षात घेऊन शहर मनसेचे उपाध्यक्ष बाळा दानवले यांनी महापालिका आयुक्त, शहरी दळणवळण विभागाचे अधिकारी आणि पोलीस वाहतूक उपायुक्त विवेक पाटील यांना निवेदन सादर केले. या निवेदनात खालील महत्त्वाच्या मागण्या व सूचना करण्यात आल्या आहेत:-
- रस्त्यांवर फुटपाथ जास्त मोठे करू नयेत, जेवढा आहे तेवढाच ठेवावा.
- फुटपाथवर सायकल ट्रॅकच करावा, स्वतंत्र सायकल ट्रॅक व पार्किंगसाठी जागा वेगळी ठेवू नये.
- प्रमुख रस्त्यांवर डिव्हायडर पूर्वीप्रमाणेच ठेवावा, साइज वाढवू नये.
- लहान अंतर्गत रस्त्यांवर सायकल ट्रॅक करू नये.
- गतीरोधक पूर्वीप्रमाणेच बसवावेत.
- फुटपाथवर बाक, मोठे राऊंड झाडाभोवती, पार्किंग बॉक्स टाळावेत.
- पार्किंग झोन आणि सायकल ट्रॅक एकत्र करावेत.
महत्त्वाचे प्रश्न उपस्थित…
या प्रकल्पामुळे भविष्यात वाहतूक कोंडी, हातगाडीधारकांची वाढ, फुटपाथवरील अतिक्रमण अशा गंभीर समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे महापालिका व वाहतूक पोलीस विभाग या जबाबदाऱ्या स्वीकारणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
मनसेचे बाळा दानवले यांनी स्पष्ट केले की, “आम्हाचा प्रकल्पाला विरोध नाही, मात्र भविष्यातील अडचणी लक्षात घेता आम्ही सूचना व उपाय सुचवत आहोत. प्राधिकरण भागातील नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आत्ताच नियोजन करणे गरजेचे आहे.”जर या मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धरणे आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
















