- आमदार महेश लांडगे यांचा पाठिंबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १ ऑगस्ट २०२५) :- मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ पुण्यात स्थापन व्हावे, या मागणीस पुण्यातील विविध वकील संघटनांसह पुणे बार असोसिएशननेही जोरदार पाठिंबा दर्शवला आहे. सरन्यायाधीश आणि राज्यपाल यांनी या मागणीचा प्राधान्याने विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेलाही या मागणीचा पाठपुरावा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मागणीस भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
ते म्हणाले, “ही मागणी केवळ वकिलांची नसून, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जनतेच्या न्यायहक्काची लढाई आहे. मुंबईला सतत प्रवास करणे हे केवळ आर्थिक व शारीरिक नव्हे, तर मानसिक त्रासदायक ठरत आहे.”
पुणे बार असोसिएशनने अधिवक्ता एस. के. जैन यांच्या अध्यक्षतेखाली ‘खंडपीठ कृती समिती’ची स्थापना केली असून, यामध्ये पुणे व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील बार असोसिएशन्सचा सहभाग आहे. यावेळी ॲड. सुरेखा भोसले, ॲड. विश्वास खराबे, ॲड. मंगेश खराबे, ॲड. हर्षवर्धन पाटील, ॲड. सुशांत शिंदे आदी उपस्थित होते.
पुणे हे न्यायव्यवस्थेसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा असलेले शहर असून, येथे खंडपीठ स्थापन झाल्यास हजारो प्रलंबित खटल्यांचा वेगाने निकाल लागू शकतो. वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होऊन नागरिकांना न्याय मिळविणे अधिक सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.















