- जनधिकार संघटनेचे अध्यक्ष माजिद शेख यांचा आंदोलनाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०२५) :- महावितरणच्या मेंटेनन्स आणि दुरुस्ती कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप जनधिकार संघटनेचे अध्यक्ष माजिद शेख यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक (प्रकाशगड मुंबई), अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे), मुख्य अभियंता (महावितरण पुणे), व विभागीय संचालक (महावितरण पुणे) यांच्याकडे लेखी निवेदन सादर करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
शेख यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहरात वीजपुरवठा हा अत्यंत अस्थिर झाला असून, नागरिक, व्यापारी व उद्योजक अक्षरशः हैराण झाले आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे मेंटेनन्स टेंडर काढून देखील वीजपुरवठा अधिकच बिघडत आहे, ही बाब संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
त्यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यात शंभर ते दीडशे कोटी रुपयांचे टेंडर ठराविक पाच-सहा ठेकेदारांकडेच दिले जातात. महावितरणचे काही अधिकारी ठेकेदारांशी हातमिळवणी करून बिलांमध्ये फसवणूक करत आहेत. बोगस कामांचे बिल उशिरा रात्रीपर्यंत काढले जात असून, अनेक कामे प्रत्यक्षात झालीच नसल्याची माहिती मिळत आहे. गवत कापणे, केबल टाकणे, ट्रान्सफॉर्मर बदलणे, खाजगी वाहने पुरवणे यासारख्या कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. ट्रान्सफॉर्मरवर बेकायदेशीर लोड वाढवून सिस्टीमला ओव्हरलोड केले जात आहे. काही अधिकाऱ्यांचे नातेवाईक या घोटाळ्यात थेट सहभागी आहेत, असा त्यांनी आरोप केला आहे.
यासोबतच, बोगस जीएसटी बिलांच्या माध्यमातून शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या साऱ्या घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, दोषींवर गुन्हे दाखल करून बडतर्फीची कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पुढील आठ दिवसांत योग्य ती चौकशी व कारवाई न झाल्यास जनधिकार संघटना तीव्र आंदोलन छेडेल. असा शेख यांनी पत्राद्वारे इशारा दिला आहे.


















