- पायाभूत सुविधा उभारणीसाठी शासकीय गायरान जमीन वापरण्यावर भर?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. ०२ ऑगस्ट २०२५) :- देहू नगरपंचायतीच्या विकास आराखड्याच्या (डीपी प्लॅन) पार्शवभूमीवर बुधवारी नगरपंचायत कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रशस्त रस्ते, वाहनतळ, उद्यान, विश्रामगृह, रुग्णालय, जलकेंद्र, ग्रंथालय, एसटीपी प्लांट, विद्युत उपकेंद्र तसेच नगरपंचायतीची नवी प्रशासकीय इमारत आदी पायाभूत सुविधा उभारण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
गेल्या काही वर्षांत देहू परिसरात लोकसंख्येच्या झपाट्याने झालेल्या वाढीमुळे अनधिकृत बांधकामे व नियोजनशून्य वसाहती निर्माण झाल्या आहेत. परिणामी, मूलभूत सुविधा पुरवण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. विकास आराखड्याच्या तयार होणाऱ्या प्रस्तावात रेड झोनमधील अडचणी, शासकीय गायरान भूखंडांचा वापर व अल्पभूधारकांच्या जमिनी न घेण्याच्या शक्यतांचा आढावा घेण्यात आला. तसेच, जर खाजगी जमिनी आरक्षणासाठी घेण्यात आल्या, तर त्याचा योग्य मोबदला देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
विकास आराखड्याला गती देण्यासाठी नियोजनबद्ध रचना करून पुढील वर्षभरात डीपी प्लॅन अंतिम करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या बैठकीस नगर रचनेचे सहाय्यक संचालक अभिजीत केतकर, नगर रचना विभागाचे मंगेश देशपांडे, सहाय्यक प्रतीक भांगे, अधिकारी सुरेंद्र आंधळे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका तसेच संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.











