- व्यायामानंतर अचानक भोवळ आल्याने घडली दुर्दैवी घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२५) :- चिंचवडमधील एका जिममध्ये व्यायामानंतर विश्रांती घेत असताना एका ३१ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. मृताचे नाव मिलिंद मुकुंद कुलकर्णी (रा. चिंचवड) असे आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद कुलकर्णी हे हिंजवडीतील एका खासगी कंपनीत नोकरीला होते. ते मागील सहा महिन्यांपासून चिंचवड येथील ‘नायट्रो’ जिममध्ये नियमित व्यायाम करत होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम केल्यानंतर त्यांनी थोडी विश्रांती घेतली व पाणी प्यायले. याच वेळी त्यांना अचानक भोवळ आली आणि ते कोसळले.
जिममधील प्रशिक्षक व इतर सदस्यांनी तातडीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नियमित व्यायाम करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिलिंद यांच्या पश्चात पत्नी, आई, बहीण व इतर नातेवाईक असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.











