- खूनाचा प्रयत्न करणारा आरोपी फरार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ०४ ऑगस्ट २०२५) :- भोसरीतील विकास कॉलनी परिसरात पैशाच्या वादातून दोन भावांवर लोखंडी कटरने हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोसरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.
फिर्यादी ऋषिकेश शदर कुबल (वय ३८), व्यवसाय – इलेक्ट्रिक कामे, रा. मांजरी, पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे व त्यांच्या भावाचे फ्लॅटवरील साफसफाईच्या कामासाठी ते ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ च्या सुमारास विकास कॉलनी, लांडेवाडी येथील स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथे आले होते.
दरम्यान, त्यांचा मित्र अनिल बबन घोलप (वय ५०, रा. च-होली, आळंदी) हा तिथे आला आणि “माझे उसने घेतलेले पैसे कधी परत करतोस?” असे म्हणत शिवीगाळ करू लागला. याच रागातून आरोपीने प्रथम फिर्यादी ऋषिकेश यांच्या गळ्यावर लोखंडी कटरने वार केला. त्यानंतर खाली गणेश मंदिराजवळ विकास कॉलनीत जाऊन त्यांच्या भावाच्या उजव्या गालावर हल्ला केला.
या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी आरोपी अनिल घोलप याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मांजरे अधिक तपास करत आहेत. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.












