न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ०४ ऑगस्ट २०२५) :- तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चाकण शाखेत बनावट सोनं देऊन १ लाख २० हजार रुपयांचे गोल्ड लोन मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेला आरोपी जब्बार करीम शेख (वय ४०, रा. राहमानिया मशीद जवळ, पडवळ, थेरगाव, पुणे) हा असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी रोहित मिलिंद थोरात (वय २७), व्यवसाय – असिस्टंट मॅनेजर, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी जब्बार शेख हा त्यांच्या चाकण येथील तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीच्या शाखेत आला. त्याने जवळील २ बनावट सोन्याच्या अंगठ्या (एकूण वजन १९ ग्रॅम ५२० मिलीग्रॅम) गहाण ठेवून गोल्ड लोन मंजूर करून १,२०,०००/- रुपये मिळवण्याचा प्रयत्न केला.
सोसायटीच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. तपासात संबंधित अंगठ्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत व कलम ६२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.












