न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ०४ ऑगस्ट २०२५) :- “मी आमदाराचा पुतण्या आहे, मी इथूनच जाणार!” असा दम देत नो-एंट्री झोनमध्ये वाहन घालण्याचा हट्ट धरत पोलिसांशी धिंगाणा घालणाऱ्या फॉर्च्युनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना चाकणमधील माणिक चौकात ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता घडली.
याप्रकरणी वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार लक्ष्मण आनाजी सांगडे (वय ४२) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, फॉर्च्युनर गाडीचा चालक मयुर काळे (पूर्ण नाव व पत्ता अद्याप अज्ञात) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार आहे.
फिर्यादी सांगडे हे चाकण येथील माणिक चौकात वाहतूक नियमनाच्या कर्तव्यावर असताना, फॉर्च्युनर गाडी चालकाने आपले वाहन नो-एंट्री असलेल्या ठिकाणी उभे केले. पोलिसांनी रोखल्यावर तो म्हणाला, “मी आमदाराचा पुतण्या मयुर काळे आहे, मी इथूनच जाणार.” त्यानंतर त्याने जोर-जोरात ओरडत पोलीस अधिकारी प्रसन्न जहाड, प्रकाश राठोड, उपनिरीक्षक नरवडे व पो.ह.वा. सचिन निघोट यांच्याशी हुज्जत घालून, “पोलीस मादरचोद असतात, पोलीस काय उपटणार आहेत काय?” असे अपशब्द उच्चारले. यात त्याने लोकसेवकाच्या आदेशाची अवहेलना केली, अपमान करून धमकी दिली, आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, चाकण पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पुढील तपास करत आहेत.












