न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने मार्च २०२२ पासून मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखला घरबसल्या मिळवण्यासाठी ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत १३,२१३ नागरिकांनी या सेवेतून लाभ घेतला आहे.
सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ६४ हजारांहून अधिक नागरिकांनी हा दाखला ऑनलाइन काढला आहे. पूर्वी नागरिकांना हा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागत असे. अनेकदा कार्यालयात फेरफटका मारावा लागत असल्याने वेळ आणि श्रमाचा अपव्यय होत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी कर आकारणी विभागाने महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर मोफत सेवा उपलब्ध करून दिली आहे.
ऑनलाइन दाखला काढण्याची पद्धत सोपी आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावरील ‘नागरिक’ पर्यायातून ‘मालमत्ता कर विभाग’ उघडून, मालमत्तेला जोडलेला मोबाईल क्रमांक किंवा मालमत्ता क्रमांक टाकावा लागतो. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकल्यावर ‘कर थकबाकीदार नसल्याचा दाखला’ हा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक केल्यास दाखला डाउनलोड करता येतो. ही सुविधा उपलब्ध झाल्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत सहाय्यक आयुक्त (कर संकलन विभाग) अविनाश शिंदे म्हणाले, “पूर्वी लोकांना कार्यालयात यावे लागायचे, वेळ आणि कागदपत्रांची दगदग होती. आता नागरिक घरबसल्या सेवा वापरत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. ही सुविधा आणखी सोपी आणि उपयुक्त कशी करता येईल, यावर आमचा भर आहे.”












