- पिकअप दरीत कोसळून १० महिलांचा मृत्यू..
- चालकाला महाळुंगे एमआयडीसी पोलीसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खेड (१२ ऑगस्ट २०२५) :- खेड तालुक्यातील पापळवाडी ते श्रीक्षेत्र कुंडेश्वर महादेव मंदिराच्या यात्रेला निघालेल्या महिलांचा पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. ही घटना सोमवार, ११ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुंडेश्वर मंदिराच्या डोंगर पायथ्याजवळ घडली. या अपघातात १० महिलांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक महिला व लहान मुले-मुली जखमी झाले आहेत. आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम तसेच मोटार वाहन कायद्याखाली चालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. २१ वर्षीय महिला फिर्यादीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषीकेश रामदास करंडे (वय २५, रा. पापळवाडी) याने मालवाहतूक पिकअपमध्ये परवानगीशिवाय महिलांना व लहान मुलांना दाटीवाटीने बसवून घाट रस्त्यावर नेले. तीव्र चढ आणि वळणांवर वाहन चालविताना त्याचा ताबा सुटला व पिकअप २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळला.
मृत महिलांमध्ये शारदा चोरघे (४०), शोभा पापळ (४५), सुमन पापळ (४७), मंदा दरेकर (५५), संजिवनी दरेकर (५०), मिराबाई चोरघे (५०), बायडाबाई दरेकर (६५), शकुंतला चोरघे (५५), पार्वताबाई पापळ (५५) व फसाबाई सावंत (५५) यांचा समावेश आहे. सर्व मृत महिला पापळवाडी, ता. खेड येथील आहेत. पोलीस निरीक्षक अनिल देवडे पुढील तपास करीत आहेत.












