- बस क्र. १००, ३३३ आणि २१ मार्ग बंद; विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे निलख (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- पिंपळे निलख परिसरातील महत्त्वाचे पीएमपी बस मार्ग अचानक बंद झाल्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (आप) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी तातडीने बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी करत प्रशासनाला इशारा दिला आहे की, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.
सध्या पिंपळे निलखहून पुणे स्टेशन (बस क्र. १००), हडपसर (बस क्र. ३३३) आणि स्वारगेट (बस क्र. २१) या मार्गांवरील बससेवा काही कारणास्तव थांबविण्यात आली आहे. या बसगाड्या परिसरातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरल्या होत्या. सेवेत खंड पडल्यामुळे नागरिकांना शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे.
काळे यांनी सांगितले, “बससेवा बंद झाल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकांना आता खासगी वाहनांचा वापर करावा लागत असून, त्याचा आर्थिक भार प्रचंड वाढला आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या बस मार्गांची सेवा पूर्ववत सुरू करावी.”
‘आप’ने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर बससेवा लवकर सुरू झाली नाही, तर पक्ष नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी पीएमपी प्रशासनावर राहील.












