- “डिव्हायडर म्हणजे भ्रष्टाचाराचा साक्षात्कार; तातडीने हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन” – डॉ. बाबा कांबळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- मोरवाडी चौकातील भ्रष्टाचारयुक्त व अपघातजन्य काँक्रिट डिव्हायडर तातडीने हटविण्याची मागणी करत, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी सोमवारी, दिनांक १० नोव्हेंबर रोजी मनपा मुख्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून डॉ. कांबळे यांनी मनपा प्रशासनावर “भ्रष्टाचार आणि जनतेच्या सुरक्षेतील बेफिकिरी”चा गंभीर आरोप केला आहे.
“निवेदन देऊनही प्रशासन गप्प बसले, हा माज आहे! कोणत्याही परिस्थितीत आंदोलन थांबणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. या डिव्हायडरमुळे वाहतूक विस्कळीत होत असून अपघात वाढले आहेत. कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास न करता मनमानी पद्धतीने हा डिव्हायडर बसवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रशासनाने दखल न घेतल्यास सोमवार, १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मनपा मुख्यालयासमोर घेराव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. कांबळे यांनी दिला आहे.












