- नेतेमंडळींच्या आश्वासनांवर चाकण वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार काय?..
- भिजत घोंगड्यावर राजकारण्यांच्या अजून किती दिवस ‘टपल्या’ खाणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण, (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाकण येथे शिवसेनेचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना चाकणमधील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार असल्याची ग्वाही दिली.
शिंदे म्हणाले, “तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाला शासनाने मान्यता दिली आहे. या मार्गाच्या कामाचे टेंडर प्रक्रिया सुरू असून सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चाकणसह संपूर्ण औद्योगिक पट्ट्यातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.”
चाकण औद्योगिक क्षेत्र हे देशातील एक प्रमुख वाहन उद्योग केंद्र आहे. येथे दररोज हजारो वाहने, ट्रक, कंटेनर, मालवाहतूक गाड्या आणि कर्मचारी प्रवास करतात. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी हा नागरिक आणि कामगारांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे.
मात्र नागरिकांचा आरोप आहे की, “राजकीय नेते प्रत्येक निवडणुकीत चाकण रस्त्यांचे आणि वाहतूक समस्यांचे मुद्दे उचलतात, पण प्रत्यक्षात कोणतीही कामे होत नाहीत.” पीएमआरडीएविरोधात झालेल्या मोर्चातही या प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “आता केवळ घोषणा आणि आश्वासने पुरेशी नाहीत. प्रत्यक्ष काम दिसले पाहिजे. खेड-चाकणकरांनी आता सर्व राजकीय पक्षांना खरा धडा शिकवण्याची वेळ आली आहे.”
या पार्श्वभूमीवर येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुका चाकण आणि खेड तालुक्यातील मतदारांच्या भावना आणि विकासाच्या अपेक्षांवर मोठा परिणाम घडवू शकतात.












