- इस्टेट नावावर करून देण्याच्या नावाखाली महिलेसह पतीला बेदम मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- काळेवाडीतील अष्टविनायक कॉलनी येथे इस्टेटवरून झालेल्या वादातून दोन भावांनी पेट्रोल टाकून गाड्यांना आग लावली, घराच्या काचा फोडल्या आणि महिलेला तसेच तिच्या पतीला मारहाण केली. या धक्कादायक घटनेत दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारास अष्टविनायक कॉलनी, ज्योतिबानगर येथे घटना घडली.
फिर्यादी महिला (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपी सचिन श्रीमंत हंगरगे (३५) आणि अमोल श्रीमंत हंगरगे (३०, दोघे रा. काळेवाडी) यांनी इस्टेट नावावर करून देण्याच्या नावाखाली वाद घालत ब्रिझा आणि बुलेट या वाहनांवर पेट्रोल टाकून आग लावली. त्यानंतर त्यांनी दगड मारून गाड्यांचे नुकसान केले व घराच्या काचा फोडल्या.
यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि तिच्या पतीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. आरोपी सचिन हंगरगेने दगड मारून फिर्यादींच्या पतीच्या कपाळावर दुखापत केली आणि पोलिसात तक्रार दिल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबाला रॉकेल टाकून जाळून टाकण्याची धमकी दिली.
या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












