- महापालिकेत भाजपकडून ऐनवेळी ‘हायब्रीड युती’चा फॉर्म्युला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 8 नोव्हेंबर 2025) :- महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये ‘हायब्रीड युती’चा फॉर्म्युला लागू करण्यात येणार आहे. ज्या प्रभागांमध्ये महायुती म्हणून लढणे शक्य आहे, तेथे युती होईल; तर उर्वरित ठिकाणी स्वबळावर लढत दिली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते शुक्रवारी (दि. ७) महापालिकेच्या प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर दौरे करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेतला आहे. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, या निवडणुका शक्यतो महायुती म्हणूनच लढवल्या पाहिजेत. मात्र ज्या ठिकाणी ते शक्य नाही, तेथे ‘हायब्रीड युती’ म्हणजे काही प्रभागांमध्ये युती व काही ठिकाणी स्वबळावर लढणे हा पर्याय निवडावा.”
ते पुढे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महापालिकेत ३२ प्रभाग आहेत. त्यापैकी किमान २२ प्रभागांमध्ये युती आणि उर्वरित १० ठिकाणी स्वबळावर लढल्यास चालेल. ज्या ठिकाणी पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे त्या पक्षाने स्वतंत्र लढावे. पण निवडणुकीचा मुख्य चेहरा महायुतीचाच राहील.”
यावेळी पार्थ पवार यांच्या कथित जमीन प्रकरणावरही पाटील यांनी भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, “हा घोटाळा मुख्यमंत्री फडणवीस किंवा भाजपाने उघड केला नाही. काही प्रकरणे नैसर्गिकरित्या समोर येतात, ती लपवली जात नाहीत. चौकशी होणारच, पण त्याचा राजकीय हेतू नाही.”
मंत्री चंद्रकांत पाटील हे तीन दिवस पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार असून, स्थानिक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करतील.












