- दिनेश सिंग आणि गणपत जगताप यांचे शस्त्र परवाने रद्द..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड, (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- परवान्यावरील शस्त्रांचा गैरवापर करून जीवितास धोका निर्माण केल्याच्या दोन गंभीर घटनांनंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कठोर पाऊल उचलत दिनेश बाबुलाल सिंग (रा. मामुर्डी, देहूरोड, पुणे) आणि गणपत बाजीराव जगताप (रा. मारुंजी, पुणे) यांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत.
पहिल्या घटनेत, दिनेश सिंग यांनी ८ जुलै २०२५ रोजी बावधन पोलिस ठाणे हद्दीत एका फार्महाऊसवरील पार्टीदरम्यान त्यांच्या परवानाधारक पिस्तुलातून हवेत दोन फायर केले होते. या फायरिंगमुळे उपस्थितांच्या जीवितास धोका निर्माण झाला आणि बावधन पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसऱ्या घटनेत, गणपत जगताप यांनी २१ जुलै २०२५ रोजी यवत येथे त्यांचे परवानाधारक शस्त्र दुसऱ्या व्यक्तीला देऊन हवेत फायर करण्यास परवानगी दिली होती. या प्रकारामुळेही जीवितास धोका निर्माण झाला असून, त्यांच्या विरोधात यवत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
दोन्ही घटनांवर प्राथमिक चौकशी केल्यानंतर परवानाधारकांनी शस्त्रांचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाल्याने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांचे परवाने रद्द करण्यात आले.
यापूर्वीही अशाच स्वरूपात शस्त्रांचा गैरवापर करणाऱ्या संतोष पवार (रा. कुदळवाडी, चिखली) आणि संतोष कदम (रा. ताथवडे, पुणे) यांचे परवाने रद्द करण्यात आले होते. एकूण सन २०२५ मध्ये चार परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले असून, पोलिस आयुक्त चौबे यांनी “शस्त्राचा गैरवापर करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही,” असा इशारा दिला आहे.












