- आरोग्य विभागाचे आवाहन; नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना ओला व सुका कचरा स्वतंत्र देण्याचे आवाहन केले आहे. शहरातील अनेक नागरिक कचरा वर्गीकरणाचे नियम पाळत असले तरी काही भागांमध्ये अद्याप ओला व सुका कचरा एकत्र दिला जातो, असे प्रशासनाचे निरीक्षण आहे.
महापालिकेने दोन वेगवेगळ्या रंगांचे डबे उपलब्ध करून दिले असून, त्यांच्या योग्य वापराने कचऱ्याचे प्रभावी वर्गीकरण, पुनर्वापर आणि कंपोस्टिंग सुलभ होईल. घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार प्रत्येक नागरिकाने घरगुती तसेच व्यावसायिक कचरा वर्गीकृत स्वरूपात देणे बंधनकारक आहे.
स्वच्छतेसाठी नियुक्त निरीक्षण पथके रोज तपासणी करत असून, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे..“शहर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले. “नागरिकांचा सक्रीय सहभागच ‘स्वच्छ पिंपरी चिंचवड’चा पाया आहे,” असे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी नमूद केले.











