- गुदमरून तिघांचा मृत्यू, एक जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२५) :- निगडीतील प्राधिकरण येथे (दि. १५) शुक्रवारी रोजी सकाळी बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरच्या कामा दरम्यान झालेल्या अपघातात तिघांचा गुदमरून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. लोकमान्य हॉस्पिटलजवळ केबल दुरुस्तीच्या कामादरम्यान ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चार सफाई कामगारांना पाइपलाइनमध्ये उतरवण्यात आले होते. मात्र, आत साचलेल्या विषारी वायूमुळे त्यांचा श्वास घुटमळू लागला. सुरक्षेची कोणतीही साधने नसल्याने तिघांनी जागीच प्राण गमावले, तर एक सहकारी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.
दत्ता होलारे, लखन धावरे (दोघेही रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी) आणि साहेबराव गिरसेप (रा. बिजलीनगर) अशी मृत कामगारांची नावे आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कामगारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अपघातानंतर नागरिकांनी प्रशासनाने कठोर सुरक्षा नियम लागू करून, कामगारांच्या जीवितास प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.












