न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ ऑगस्ट २०२५) :- सायबर फसवणुकीतून मिळालेली कोट्यवधींची रक्कम रोख स्वरूपात काढून ती क्रिप्टोकरन्सीत रुपांतर करणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात यापूर्वी चित्रपट निर्माता शिवम बाळकृष्ण संवत्सरकार याला अटक करण्यात आली होती.
फिर्यादी अकाऊंटंट असलेल्या व्यक्तीला यूट्यूबवरील स्टॉक मार्केट संदर्भातील व्हिडिओ पाहून अॅपवर गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. फिर्यादीकडून ₹५७.७० लाखांची गुंतवणूक करून ₹५.१५ कोटी प्रॉफिट दाखवण्यात आले. मात्र पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करताच विविध चार्जेसच्या नावाखाली पैसे मागण्यात आले. त्यानंतर सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल झाली.
तपासात बँकेतील मारुफ रिअल इस्टेट या नावाच्या खात्यात रक्कम जमा होऊन ती काढून USDT क्रिप्टोकरन्सीत रुपांतरित केल्याचे समोर आले. या खात्यातून ₹११.९३ लाखांचा व्यवहार झाला असून ७ तक्रारी नोंद झाल्या आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी १) साहिल अन्वर सय्यद (२२, बीबीए विद्यार्थी, रा. कोंढवा, पुणे), २) भुपेंद्र अवतार सिंग (३४, पासपोर्ट एजंट, रा. कोंढवा, पुणे),३) सर्फराज रफीक सय्यद (२९, गॅरेज व्यवसाय, रा. कोंढवा, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.












