- पाटबंधारे विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ ऑगस्ट २०२५) :- पवना धरण सध्या ९७.४५ टक्के भरलेले असून पुणे जिल्हा व घाटमाथा परिसराकरिता हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली असून मोठा येवा धरणात येत आहे.
या पार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज सोमवारी (दि. १८) दुपारी २ वाजता जलविद्युत केंद्राद्वारे ८०० क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती पवना धरण पूरनियंत्रण कक्ष, खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली.
पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण व येवा लक्षात घेऊन धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग पुढील काळात कमी-जास्त केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, सतर्क राहावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












