- ९५० नागरिकांचे स्थलांतर; जूनी सांगवी आणि मोई परिसर प्रभावित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० ऑगस्ट २०२५) :- शहरात गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना व मुळशी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू असून पिंपरी-चिंचवड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पवना धरणातून १४,३७० तर मुळशी धरणातून २५,४०० क्यूसेक पाणी सकाळी नऊ वाजता सोडण्यात आले.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या भागातील १८३ कुटुंबातील ९५० नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले असून त्यांच्यासाठी शाळा, सभागृहे व समाजमंदिरांमध्ये निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. अन्न, पाणी, वीज तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मोई येथील पूल परिसर आणि मधुबन सोसायटी, जुनी सांगवी हे भाग विशेषतः प्रभावित झाले आहेत. महापालिकेने आठ प्रादेशिक कार्यालयांत मदत केंद्रे उभारली असून अग्निशमन दलाकडून बोटी, पंप व वाहनांची तैनाती केली आहे. याशिवाय आरोग्य, मलनि:सारण व घनकचरा विभागांची पथके सतत कार्यरत आहेत. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना सोशल मीडियासह रेडिओच्या माध्यमातून दिल्या जात आहेत.
महापालिका आयुक्त शेखर साहेब यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे व महापालिकेकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन संपर्कासाठी महापालिकेचे ०२०-६७३३११११ व ०२०-२८३३११११ हे क्रमांक २४ तास कार्यरत आहेत.












