न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० ऑगस्ट २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच गृहनिर्माण संस्थांना गणेशोत्सवासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सलग तिसऱ्या वर्षी राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेत मंडळांना www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर “गणेश उत्सव मंडप परवानगी २०२५” या लिंकवर नोंदणी करावी लागणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील तसेच देहू, आळंदी, देहूरोड, शिरगाव, परंदवाडी, तळेगाव आदी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील मंडळांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल. मंडळांनी अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांची माहिती, मिरवणुकीचा मार्ग, वापरली जाणारी वाहने, विद्युत रोषणाई, देखावे यांचा तपशील संगणक प्रणालीत अपलोड करावा लागणार आहे. संबंधित प्रादेशिक कार्यालयाचे स्थापत्य विभाग प्रथम ना हरकत दाखला देईल, त्यानंतर पोलीस आयुक्तालय व वाहतूक विभागाची परवानगी मिळेल.
मनपाच्या कार्यक्षेत्राबाहेरील मंडळांनी प्रथम स्थानिक नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला घेणे आवश्यक आहे. ही संपूर्ण सुविधा नागरिकांसाठी विनाशुल्क उपलब्ध आहे.
महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, “दोन्ही कार्यालयांकडील परवानग्या कमी वेळेत, कोणत्याही शासकीय चकरा न मारता मंडळांना मिळाव्यात या उद्देशाने ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. मंडळांनी जास्तीत जास्त संख्येने या सेवांचा लाभ घ्यावा.”
याचबरोबर गणपती मूर्ती विक्रीसाठीचे स्टॉल उभारणाऱ्या विक्रेत्यांसाठीही ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे व शुल्क ऑनलाईन भरावे लागणार असून, दिलेल्या परवानगीवर क्यूआर कोड असणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना पडताळणी सोपी होईल.
मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले की, “शाडू माती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री होत आहे की नाही याचीही माहिती या प्रणालीतून मिळणार आहे.”












