न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | दि. २० ऑगस्ट २०२५ :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पुन्हा एकदा राज्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत नुकत्याच जाहीर झालेल्या एप्रिल व मे २०२५ च्या राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रमांच्या रँकिंगमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने सलग दोन महिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
एप्रिल महिन्यात ४५.१८ गुणांसह तर मे महिन्यात ४७.७० गुणांसह महापालिकेने अव्वल स्थान मिळवले. या रँकिंगमध्ये मातृत्व व बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रण, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंध, आयुष्मान भारत योजना, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मानांकन, मोफत निदान सेवा, ई-औषधी, आशा कार्यक्रम आदी २० हून अधिक महत्त्वाचे निर्देशक विचारात घेण्यात आले होते. राज्यस्तरावर सलग दोन महिने अव्वल स्थान पटकावल्याने पिंपरी चिंचवड शहराचा सन्मान वाढला आहे.
महापालिकेच्या या यशाबद्दल आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले, “ही यशस्वीता वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर व नागरिकांच्या सहकार्यामुळे शक्य झाली आहे. पुढेही उत्तमोत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोरटे यांनी सांगितले की, “ही रँकिंग केवळ आकडेवारी नसून आरोग्य सेवेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची पावती आहे. महिलांचे व बालकांचे आरोग्य, लसीकरण आणि रोगांवरील नियंत्रण यावर आम्ही सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे.”
तर वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, “ही कामगिरी प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यापासून ते तज्ञ डॉक्टरांपर्यंत सर्वांच्या योगदानामुळे शक्य झाली आहे. आगामी काळात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ही कामगिरी टिकवण्याचा आमचा प्रयत्न असेल.”












