- चार दिवसांत पाच जणांकडून कोयते, गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरात धडाकेबाज कारवाई करून वेगवेगळ्या भागांतून कोयते, गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे असा घातक शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
थेरगाव परिसरात १८ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा कोयते बाळगल्याच्या आरोपावरून दोन तरुणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून पाच कोयते जप्त करण्यात आले.
दापोडी येथे फुगेवाडी फ्लायओव्हरखालील पार्किंगमध्ये छापा टाकला असता, एका तरुणाकडून ५१ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतूस हस्तगत झाले.
चिखलीतील मोरेवस्ती परिसरात पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे छापा घालावा लागला. येथे आरोपीकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला.
हिंजवडीतील कस्तुरी चौकाजवळ पोलिसांनी एका तरुणाला पकडून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त केले. या शस्त्रांची किंमत तब्बल ५१ हजार रुपये इतकी आहे.
ही सर्व कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आरोपींनी शस्त्रे जवळ बाळगल्यामुळे करण्यात आली आहे. सदर आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.












