- तब्बल ८.४० लाखांच्या २० दुचाकी जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : (दि. २१ ऑगस्ट २०२५) :- काळेवाडी पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या टोळीवर कारवाई करून तब्बल ८.४० लाख रुपये किंमतीच्या २० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. यामध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले १० गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील पाचपीर चौकात सापळा लावून पोलिसांनी शुभम चंद्रकांत शिंदे (२६, रा. नढेनगर, काळेवाडी, मूळ रा. रायगड) याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून त्याचा साथीदार सोमनाथ शांताराम कासरुंग (३२, रा. मुळशी, मूळ रा. रायगड) यालाही अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपींकडून हिरो होंडा, स्प्लेंडर, युनिकॉर्न, पल्सर व अॅक्टीव्हा अशा विविध २० दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यापैकी १० वाहनांबाबत काळेवाडी, हिंजवडी, वाकड, चिंचवड, चिखली व तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदलेले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या पथकाने केली. या पथकात सहा. पो. नि. वैभव गुरव, पो. उपनि. नागनाथ सुर्यवंशी, श्रेणी पो. उपनि. राजेंद्र काळे यांच्यासह अन्य पोलिसांचा सहभाग होता.

















