न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : (दि. २१ ऑगस्ट २०२५) :- देहू-आळंदी रोडवरील तळवडे येथील सम्राट गार्डन हॉटेलमध्ये बिलाच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेत ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.
मृताचे नाव गणेश लक्ष्मण पोखरकर (वय ३४, रा. विठ्ठलवाडी, देहुगाव) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गणेश पोखरकर हे त्यांचे परिचित आरोपी विनोद विश्वनाथ मोरे (४५), गोरख विष्णु कुटे (४५), संतोष आनंद मराठे (३९) आणि चंद्रकांत दत्ता बुट्टे (३९) यांच्यासोबत दारु पित बसले होते.
हॉटेलचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून आरोपी विनोद मोरे याने रागाच्या भरात हॉटेलमधील लाकडी दांडक्याने गणेश पोखरकर यांच्या पाठीवर, पोटावर आणि छातीवर मारहाण केली. त्यानंतर आरोपींचे साथीदार गोरख कुटे, संतोष मराठे आणि चंद्रकांत बुट्टे यांनीही मिळून संगनमत करून लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी पोखरकर यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये ते गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले.
या प्रकरणी फिर्याद पोलीस हवालदार संतोष सुदाम बांबळे (ब.नं. ८९२) यांनी दिली असून, देहुरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी क्रमांक १ ते ३ यांना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास पोउपनि वाघमारे करीत आहे.












