न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : (दि. २१ ऑगस्ट २०२५) :- आकुर्डी येथील खंडोबा माळ झोपडपट्टी आता हटवली जाणार असून, त्याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जाणार आहे. या योजनेत १२४ झोपडीधारकांना मोफत व ६ जणांना सामूहिक पुनर्वसन मिळणार आहे.
वाकडकर पाटील असोसिएट्स या विकासकाकडून योजना राबवली जाणार असून, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला आहे. या योजनेस १४ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तर, १३ मार्च २०२४ रोजी क्षेत्र निश्चित करणारा अंतिम आदेश देण्यात आला होता.
झोपड्या हटवण्यापूर्वी पात्र झोपडीधारकांना तात्पुरते स्थलांतरित करून दरमहा किमान ₹६,५०२/- भाडे विकासकाकडून दिले जाईल. तसेच एक वर्षाचे भाडे आगाऊ देणे बंधनकारक आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, झोपडीधारकांनी ५० दिवसांत झोपडी रिकामी करणे आवश्यक आहे. अन्यथा पुनर्वसन हक्क गमावले जातील व कायदेशीर निष्कासनाची कारवाई होईल.












