न्यूज पीसीएमसी नेटवर्क
लोणावळा (दि. २९ मे २०१९) :- येथील देवले गावात एका युवकाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता १ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दत्ता ज्ञानदेव केदारी (वय ३२, रा. ताजे, ता. मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेतील मुख्य तीन आरोपींना चोवीस तासांत अटक करण्यात आली. लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे.
या प्रकरणी संतोष ज्ञानदेव केदारी (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सोमनाथ बाळू कोरडे (वय २२, रा. ताजे, मावळ), प्रशांत शांताराम आंबेकर (वय २१) आणि प्रवीण लक्ष्मण गोणते (वय २१, दोघे रा. देवले, मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. आरोपीला मंगळवारी (दि. २८) वडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत दत्ता केदारी हा सोमवारी (दि. २७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास औंढेगाव येथून कामावरून घरी परतत होता. त्यावेळी मुख्य आरोपी सोमनाथ कोरडे यांनी त्याच्या अन्य दोन साथीदारांसह दत्ता केदारी याला देवले गावाच्या हद्दीतील देवले खिंडीत गाठून त्याच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर धारदार शस्त्रांनी वार करून गंभीर जखमी करून निर्घृण खून केला.
पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे तपास करीत आहेत. या घटनेमध्ये आणखी काही आरोपींचा सहभागी आहेत का, याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक लुकडे यांनी दिली.











