- दळवीनगर-आनंदनगर प्रस्तावित कारवाईवरून भोईरांचा हल्लाबोल..
- पावसाळ्याच्या तोंडावर होणाऱ्या कारवाईला दर्शवला तीव्र विरोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी दळवीनगर ते आनंदनगर रेल्वे हद्दीतील प्रस्तावित बेदखली कारवाई आणि SRA प्रकल्पावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनावर जोरदार टीका केली.
आज शुक्रवारी महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आयुक्त, रेल्वे प्रशासन आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला दिलेल्या पत्राची माहिती दिली.
रेल्वे विभागाकडून 8 आणि 11 जून रोजी रेल्वे रुंदीकरणासाठी कारवाई होणार असल्याचे समजत असताना सध्या विधानपरिषदेची आचारसंहिता लागू आहे. अशा परिस्थितीत ही कारवाई कशी केली जात आहे, असा सवाल भोईर यांनी उपस्थित केला. पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना बेघर करण्याचा निर्णय अमानवी असल्याची टीकाही त्यांनी केली.
“SRA हे काहींच्यासाठी कुरण बनले असून येथे मोठे रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटच्या मागे कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
दळवीनगर-आनंदनगर परिसरातील अनेक कुटुंबे गेली २० ते २५ वर्षे वास्तव्यास आहेत. त्यांना SRA योजनेसाठी पात्र ठरवले जात असेल तर आधी पुनर्वसनाची सदनिका अथवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
रेल्वे, SRA आणि महापालिका प्रशासनाने पात्र व अपात्र लाभार्थ्यांची पारदर्शक पडताळणी करावी, अन्यथा अनेक खरे लाभार्थी न्यायापासून वंचित राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांचे शिक्षण, महिलांची सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय आणि पुनर्वसनापूर्वी होणारी कारवाई याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी करत भोईर यांनी “विकासाला विरोध नाही, मात्र नागरिकांना बेघर करून विकासाचा मार्ग स्वीकारला जाऊ शकत नाही,” असा हल्लाबोल केला.















