- मराठा आरक्षणाच्या लढ्यात महत्त्वाचा टप्पा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०२ सप्टेंबर २०२५) :- मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टपासून मुंबईत बेमुदत उपोषण सुरू केलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज (२ सप्टेंबर) आपले आंदोलन मागे घेतले.
मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन सरकारच्या निर्णयांची माहिती दिली. या निर्णयांवर आधारित जीआर जाहीर झाल्यानंतर जरांगे यांनी तो स्वीकारत उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. तसेच आज रात्री ९ वाजेपर्यंत आंदोलक मुंबई सोडतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या निर्णयांनुसार हैदराबाद गॅझेटिअरप्रमाणे कुणबी नोंदी करण्यात येतील, सातारा गॅझेटिअरची अंमलबजावणीही कायदेशीर अभ्यासानंतर पुढील १५ दिवसांत होईल. आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्यात येतील. तसेच आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरीसह तातडीने आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
जरांगे यांनी जाहीर केले की, “मराठा आणि कुणबी एकच आहेत, याबाबत सरकार जीआर काढणार आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काटेकोर पालन व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे.”
दरम्यान, शिष्टमंडळात मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे उपस्थित होते. विखे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी सुरू झाल्याचे नमूद करत, आरक्षणाचा प्रश्न योग्य दिशेने मार्गक्रमण करतोय, असा विश्वास व्यक्त केला. या घडामोडींमुळे मराठा आरक्षण आंदोलनात नवी दिशा मिळाली आहे.


















