- भोसरी येथील अन्न नागरी पुरवठा कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१३ डिसेंबर २०२५) :- भोसरी येथील अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या “फ” झोन कार्यालयात रेशनकार्ड मंजुरीसाठी लाच मागून ती स्वीकारणाऱ्या परिमंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, “फ” झोन कार्यालय, भोसरी येथे करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी गजानन अशोकराव देशमुख (वय ३६, पद – परिमंडळ अधिकारी, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग “फ” झोन, भोसरी) यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी प्रविण नारायण निंबाळकर (वय ३९, व्यवसाय नोकरी, पद – पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
तक्रारीनुसार, तक्रारदारांच्या मित्र व ओळखीच्या १४ जणांची नवीन रेशनकार्डे मंजूर करून त्यावर सही-शिक्का मारून देण्यासाठी आरोपी लोकसेवकाने सुरुवातीला १४ पैकी १० रेशनकार्डसाठी प्रत्येकी १,५०० रुपये आणि उर्वरित ४ रेशनकार्डसाठी प्रत्येकी १,००० रुपये अशी एकूण १९,००० रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती प्रत्येकी १,२०० रुपये प्रमाणे १६,८०० रुपये आणि अखेरीस १६,००० रुपये लाच रकमेवर सौदा करण्यात आला.
११ डिसेंबर रोजी पंचासमक्ष आरोपीने तक्रारदार योगेश जाधव यांच्याकडून १६,००० रुपये लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून आरोपीस रंगेहाथ पकडले. या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक शेडगे (प्र.वि., पुणे) यांनी केले असून तपास पोलीस उपनिरीक्षक दलालवाड हे करत आहेत.


















