- राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या इच्छुकांचा भाजपकडे लोंढा?..
- पिंपरी-चिंचवड शहरातील महायुतीवर प्रश्नचिन्ह?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ डिसेंबर २०२५) :- महापालिका निवडणुका अत्यंत निकट आल्या असताना पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नव्या ट्रेंडमुळे महायुतीतील घटक पक्ष अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. महायुतीचे वरवरचे ऐक्य जपण्याचे प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांतील अनेक इच्छुक थेट भाजपकडे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पोहोचले. त्यामुळे “महायुतीच्या नीतिमत्तेलाच सुरूंग लावण्याचे षडयंत्र नेमकं कोणाकडून सुरू आहे?” हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महापालिका निवडणूकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते, या अंदाजामुळे इच्छुकांमध्ये चढाओढ वाढली आहे. मात्र, महायुतीतील सहयोगी पक्षांना स्वतःच्या तिकिटावर विजय मिळण्याबाबत खात्री नसल्याने भाजप हा सुरक्षित पर्याय मानला जात असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी विविध पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच नवोदित चेहरेही भाजपकडे अर्जासाठी धाव घेत असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
वरच्या पातळीवर महायुतीत समन्वय सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी तळागाळातील समीकरणे उलटी असल्याचे दिसत आहे. ठरावीक प्रभागांत कोणत्या पक्षाला संधी मिळेल, याबाबत महायुतीत आधीपासून मॅपिंग झाले असतानाच काही ठिकाणी भाजपचे इच्छुक “पहिला हक्क आमचाच” असा सूर धरून मैदानात उतरले आहेत. भाजपची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक स्तरावरील पकड पाहता इतर दोन पक्षांतील इच्छुक कोपऱ्यात ढकलले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे.
या तणावामुळे काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी थेट त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे धाव घेत आहेत. “आपल्या जागांवरही भाजपच उमेदवार देणार असेल तर महायुतीचा अर्थ काय?” असा सवाल दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांनी उघडपणे उपस्थित केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यासाठी मोजके काही दिवस उरले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात महायुती धर्म टिकून राहील का? याचं उत्तर महायुतीतील जागावाटप आणि उमेदवारांची अंतिम यादीच ठरवु शकते. त्यामुळे आगामी काही दिवसांत घटक पक्षांमध्ये बंद-दरवाजा बैठका वाढतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.


















