न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१३ डिसेंबर २०२५) :- श्री गणेश, श्री दत्त महाराज आणि विठ्ठल–रखुमाई यांच्या पावन आशीर्वादाने प्रभाग क्रमांक २६ मध्ये आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष आणि आगामी महापालिका निवडणुकीचे उमेदवार रविराज काळे यांचे परिचयपत्रक वाटप कार्यक्रमाची शुभ व मंगल सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी परिसरातील नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्यात आला. नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास, प्रेम आणि उत्साह हेच आजवरच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचे खरे बळ असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आजपर्यंत करण्यात आलेली प्रत्येक सेवा ही नागरिकांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच शक्य झाली आहे. जनतेकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि आपुलकी पाहून पुढील काळात अधिक जबाबदारीने, अधिक जोमाने आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम करण्याची नवी उमेद मिळाल्याचे रविराज काळे यांनी सांगितले. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व पारदर्शक प्रशासन यासंबंधी नागरिकांनी आपल्या अपेक्षा व सूचना मांडल्या. या सर्व मुद्द्यांना प्राधान्य देऊन टप्प्याटप्प्याने सोडवण्याचा निर्धार रविराज काळे यांनी व्यक्त केला. जनतेच्या सहभागातून विकासाची दिशा ठरवणे आणि लोकहित केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेणे हेच आम आदमी पार्टीचे धोरण असून, त्याच धर्तीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये बदल घडवून आणण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


















