न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१३ डिसेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा विभागाअंतर्गत इच्छुक विद्यार्थ्याकरीता सावित्रीबाई फुले अकादमी, आय ट्रेंड लाईफ–३, काळा खडक, वाकड येथे अकादमी सुरु करण्यात आली आहे. सदर अकादमीमध्ये सध्या विद्यार्थ्यांसाठी काही जागा रिक्त असून त्या भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
एसआयएसीमार्फत आयोजित करण्यात आलेली प्रवेश परीक्षा दिलेल्या परंतु अंतिम निवड न झालेल्या तसेच प्रवेश परीक्षा न दिलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असलेल्या पदवीधर व UPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करता येऊ शकतात. अर्ज करणारा विद्यार्थी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी कोऱ्या कागदावर संचालक, सावित्रीबाई फुले अकादमी यांच्या नावे अर्ज सादर करणे गरजेचे असणार आहे. अर्जासोबत दहावीची गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्राच्या छायाप्रती जोडणे आवश्यक आहे. तसेच रहिवासी पुराव्यासाठी आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पालकांच्या नावे असलेले विद्युत देयक, रेशनकार्ड, वाहनचालक परवाना किंवा पालकांच्या नावे असलेली कर पावती यापैकी कोणताही एक पुरावा सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांना दहावी (एस.एस.सी.) परीक्षेतील गुणांच्या आधारे प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती अकादमीच्या वतीने देण्यात आली आहे.
अर्जाची शेवटची तारीख १८ डिसेंबर असून रात्री १२.०० वाजेपर्यंत अर्ज sports@pcmcindia.go.in या ई-मेलवर पाठविता येणार आहेत. तसेच १८ डिसेंबर पर्यंत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अर्ज क्रीडा विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यालय, खराळवाडी येथे प्रत्यक्ष देखील सादर करता येऊ शकतात. कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० असून साप्ताहिक सुट्टी वगळता अर्ज स्वीकारण्यात येतील. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.pcmcindia.gov.in भेट द्यावी असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


















