- काळेवाडीत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि.१३ डिसेंबर २०२५) :- काळेवाडी परिसरात लग्नाला न गेल्याच्या कारणावरून तरुणावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपीस अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ११ डिसेंबर २०२५ रोजी रात्री दीडच्या सुमारास श्रद्धा कॉलनी, ज्योतीबानगर, काळेवाडी येथे घडली. या प्रकरणातील फिर्यादी सुरज गयाप्रसाद यादव (वय ३६, व्यवसाय चालक, रा. महाराष्ट्र कॉलनी, काळेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वहिनीच्या लग्नाला न गेल्याचा राग मनात धरून आरोपी विजय यादव, अजित यादव, अजय यादव, संकेत सुपेकर आणि संतोष कुरवत (सर्व रा. काळेवाडी) यांनी त्यांच्यावर हल्ला केला. “याला पकडा, आज जिवंत सोडायचा नाही,” असे म्हणत आरोपींनी फिर्यादीवर तुटून पडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपी अजित यादव याने फिर्यादीची मान काखेत दाबून श्वास कोंडण्याचा प्रयत्न केला, तर विजय यादव याने पाठीमागून जोरात दाबून धरले. अजय यादव याने दांडक्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला असता तो डाव्या गालावर लागून फिर्यादी जखमी झाला. तसेच संकेत सुपेकर व संतोष कुरवत यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मेटे हे करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.


















