- ५० अवैध पिस्तुले व ७९ जिवंत काडतुसे जप्त..
- ११६ धारधार शस्त्रांसह १११ जणांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाने अवैध शस्त्रांविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठी यशस्वी कामगिरी केली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिलेल्या आदेशानुसार १३ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ दरम्यान सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखांकडून कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी ४० गुन्हे दाखल करुन ४५ आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ५० पिस्तुले व ७९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याशिवाय धारधार घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांवर ९४ गुन्हे दाखल करुन ६६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ११६ धारदार शस्त्रे (कोयते-९१, तलवारी-१२, पालघन-०४, सुरा/चाकू/गुप्ती-०६) पोलिसांनी हस्तगत केली.
सोशल मीडियावर धारदार शस्त्रांसह फोटो व रील्स टाकणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली असून ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या मोहिमेत विशेष उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा युनिट-४ ने केली आहे. त्यांनी जेलमधून सुटलेला सराईत गुन्हेगार पवन देवेंद्र बनेटी (रा. पिंपळे गुरव) याच्याकडून दोन पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे जप्त केली.
तसेच सराईत गुन्हेगार गणेश कांबळे ऊर्फ मॅड गण्या, ऋषीकेश ऊर्फ शेऱ्या आडागळे, बाबा सैफन शेख, राहुल ऊर्फ सोन्या ढगे, प्रताप ऊर्फ बाळु पवार, वैभव विटे यांच्याकडूनही अवैध शस्त्रास्त्रे व काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
ही संपूर्ण मोहीम पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, परिमंडल उपआयुक्त विशाल गायकवाड, संदिप आटोळे, डॉ. बापु बांगर, गुन्हे शाखेचे उपआयुक्त शिवाजी पवार तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व गुन्हे शाखेचे पथक यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.
पोलिसांच्या या मोहिमेमुळे शहरातील अवैध शस्त्रबाळगणाऱ्यांना चांगलाच चाप बसला असून पुढील काळात ही कारवाई आणखी कठोर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.











