न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज गुरुवार (दि. ४) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी उपस्थिती लावली. “ओबीसी आरक्षण वाचवा”, “एकच पर्व भटक्या-विमुक्तांसह ओबीसी सर्व” अशा घोषणा देत समाजातील बांधवांनी आपला रोष व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान आंबेडकर चौक घोषणांनी दुमदुमून गेला. भटक्या-विमुक्त समाजासह ओबीसी बांधव एकत्र येऊन त्यांनी एकजुटीचे प्रदर्शन केले. ओबीसी आरक्षणावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
सकल ओबीसी समाजाच्या वतीने या आंदोलनादरम्यान मनोगत मांडण्यात आले. आरक्षण ही केवळ अधिकाराची बाब नसून सामाजिक न्यायाची हमी आहे, असे स्पष्ट करत ओबीसी नेत्यांनी शासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी केली. या आंदोलनामुळे ओबीसी समाजात एकजुटीचा संदेश देण्यात आला.











