- पालिकेच्या नियमांची उघडउघड पायमल्ली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड, (दि. ०४ सप्टेंबर २०२५) :- प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर काही महिन्यांत निवडणुका होणार असल्याची चाहूल लागताच इच्छुकांनी शहरात फलकांची अक्षरशः जत्रा भरवली आहे.
प्रभागातील प्रत्येक गल्ली, नाक्यावर वाढदिवस, घरगुती गणेशोत्सव, गौरी स्पर्धा यांचे आयोजन होत असून, या कार्यक्रमांत सहभागी नागरिकांवर बक्षिसांची लयलूट केली जात आहे. मात्र, हे सर्व करताना महापालिकेच्या नियमांकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे.
नियमानुसार, शहरात कुठेही जाहिरातफलक लावण्यासाठी पालिकेची परवानगी घेणे आणि शुल्क भरणे बंधनकारक आहे. तरीसुद्धा परवानगी न घेता शहरभर मोठ्या प्रमाणात फलक लावले जात आहेत.
या प्रकारामुळे शहराची शोभा मलिन होत असून, बेकायदेशीर फलकांच्या उच्छादाने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थानिक नागरिक संघटनांकडून आता महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि जाहिरात नियंत्रण विभागावर कारवाईसाठी दबाव वाढला आहे.
निवडणूक समीप आल्या की फलकांचा उच्छाद वाढतो, पण नियमांची अंमलबजावणी मात्र गायब होते, अशी टीका नागरिक करत आहेत. याबाबत महापालिकेने तातडीने पावले न उचलल्यास शहराचा चेहरामोहरा आणखी बकाल होण्याची शक्यता आहे.











