न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड, (दि. ०४ सप्टेंबर २०२५) :- चिंचवडगावातील मोरया हॉस्पिटल जवळील रस्ता पावसामुळे पुन्हा उखडला असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. महिनाभरापूर्वीच या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र अल्पावधीतच पुन्हा डांबरीकरण उखडून खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.
पावसाच्या तडाख्यात पुन्हा रस्ता उखडल्याने महापालिकेच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दररोज या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा सामना करावा लागू शकतो.
स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी केली आहे. महापालिका केवळ दिखाऊ डागडुजी करून जबाबदारी झटकते, पण दर्जेदार रस्त्याचे काम केले जात नाही,” अशी टीका परिसरातील नागरिक करत आहेत.











