न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ सप्टेंबर २०२५) :- शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी आणि मुख्याध्यापक पदोन्नतीचे आदेश अखेर निर्गमित झाले आहेत. यामध्ये १७२ शिक्षकांना निवड श्रेणी, ७८ शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी तर अनेक पात्र शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नती मिळाली आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशामुळे शिक्षकवर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
या विषयावर भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यास अखेर यश मिळाले. “शिक्षकांचा सन्मान अबाधित ठेवत त्यांच्या योगदानाला मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या यशासाठी झटणाऱ्या गुरुजनांना योग्य तो सन्मान मिळावा हे आमचे कर्तव्य आहे,” असे आमदार लांडगे म्हणाले.
या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील शिक्षकांच्या हक्कांची लढाई यशस्वी ठरली असून, शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आलेला हा निर्णय संस्मरणीय ठरला आहे.











