- तळवडेत माजी नगरसेवकाकडून अजितदादांच्या स्वागतासाठी अनधिकृत फलकबाजी..
- “आता दादा बारामती पॅटर्ननुसार तंबी देणार की पाठीशी घालणार?”…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळवडे, (दि. ५ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरात नियमबाह्य फलकबाजीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात स्पष्टपणे सांगितले होते की “काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बोर्डाची गरज नसते. बारामतीत तर अनधिकृत बोर्डबाजीवर थेट गुन्हे दाखल होतात. नागरिकांनीही बोर्ड लावणाऱ्यांना मतदान करू नये.”
दरम्यान तळवडे परिसरात आज खुद्द अजितदादांच्या स्वागतासाठी राष्ट्रीवादीच्याच माजी नगरसेवकाकडून महापालिकेच्या विजेच्या खांबांवर त्यांच्याच स्वागताचा फलक लावण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर मुख्य चौकात अनधिकृत स्वागत कमान द्खील उभारली आहे.
मग आता अजितदादा या नगरसेवकाला तंबी देणार? की त्याला पाठीशी घालणार?, असा सवाल शहरातील नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
नियमांचे पालन करण्याची जबाबदारी घेतलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच असा नियमभंग होत असेल तर, इतरांना मोकळ रानच मिळाल आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची चुप्पी देखील बरेच काही सांगुन जातेय. अशा प्रकरणांकडे डोळेझाक केल्याने प्रशासनदेखील धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याची टीका नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
अनधिकृत जाहिरातींमुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून, पिंपरी-चिंचवड शहरात नेते “बोलतात एक आणि कार्यकर्ते करतात एक” ही नविन संकल्पना अधिक दृढ होऊ पाहत आहे.











