न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी, (दि. ५ सप्टेंबर २०२५) :- ग्रामसेवक पदावर सरकारी नोकरी लावून देतो असे सांगत एका व्यक्तीची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दिपक मल्लिनाथ भोसल (वय ३४, रा. भोसरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी राजेश राकेश पासवान (रा. विजय चौक, छत्रपती संभाजीनगर) याने स्वतःला ग्रामसेवक असल्याचे भासवले. त्याने फिर्यादीला ग्रामसेवक पदावर शासकीय नोकरी मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून रोख स्वरूपात २ लाख रुपये घेतले.
आरोपीने वेळोवेळी खोटे आश्वासन देत फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी भारत सरकारची राजमुद्रा असलेले खोटे नियुक्तीपत्र देखील दाखवले. मात्र, प्रत्यक्षात नोकरी न देता फिर्यादीची फसवणूक केली.
ही घटना २ मार्च २०२४ ते जून २०२४ दरम्यान अंकुशराव नाट्यसभागृह, पीएमटी चौक, भोसरी येथे घडली. प्रकरणी भादंवि कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. पुढील तपास पोउपनि. कस्तुरे करत आहेत.











